पेण तालुक्यातील खारबंदिस्ती भरतीच्या पाण्यामुळे फुटली असून या सतत फुटणार्या खारबंदिस्तीमुळे या कामातील निकृष्टपणा आता समोर येत आहे. पुन्हा एकदा तालुक्यातील भाल - विठ्ठलवाडी या भागातील खारबंदिस्ती फुटल्यामुळे शेतकर्यांची हजारो एकर शेती खार्या पाण्याखाली गेली आहे, यामुळे शेतकरी शासना विरोधात संतप्त झाले आहेत.मागील अनेक वर्षे याबाबत शेतकरी खारलँड विभागीय कार्यालयात फेर्या मारून ही बाब लक्षात आणून देत असून देखील याकडे दुर्लक्ष झाल्यानेच ही बंदिस्ती तुटत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे.
येथील नागरिकांचा विचार केला तर उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना मागील अनेक दशकांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे, तर पावसाळ्यात अतिवृष्टी आणि भरतीमुळे फुटत असणार्या खारबंदिस्ती आणि त्यामुळे शेतीचे होणारे नुकसान लक्षात घेता या शेतकर्यांना वर्षभर पाणीबाणी ला सामोरे जावे लागत आहे.
सद्य स्थितीत तरी यावर मात करणे कठीण असून या भागातील सोळा किलोमीटर लांबीच्या खारबंदिस्ती साठी 51कोटी रुपये जागतिक बँकेकडून मंजूर होत असून येत्या 15 ते 20 दिवसात त्याचे काम सुरू होणार आहे.