कळंबोलीत सिडकोने काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या विविध कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या पदपथाच्या पेव्हर ब्लॉकची डागडुजी केली, मात्र रस्त्याच्या कडेला पेव्हरब्लॉक व्यवस्थित लावण्यात न आल्यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
खड्डे पडलेल्या रस्त्याचे डागडुजीकरण, खराब झालेले पदपथ, गटार, दुरुस्त करणे, डांबरी रस्त्यांचे पृष्ठीकरण करणे आदी कामांसाठी दोन महिन्यांपूर्वी सिडकोने सुमारे ८ कोटी रुपयांचे कंत्राट काढले आहे. झेनिथ कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम दिले. लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी कळंबोली विविध ठिकाणी कामे सुरू होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथाचे जुने पेव्हरब्लॉक काढून रस्त्यावर कडेला लावलेल्या पेव्हब्लॉकची उंची वाढविणे अपेक्षित होते. सध्या लॉकडाऊनमुळे कळंबोलीतील रस्ते मोकळे आहेत. रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या नाहीत. त्यामुळे कंत्राटदाराने केलेल्या कामावर शंका निर्माण होईल, असे चित्र आहे.
पेव्हरब्लॉक काढल्यानंतर रस्त्यावर लावलेल्या पेव्हरब्लॉकची उंची वाढविली पाहिजे होती, मात्र कळंबोलीतील सुमारे एक किलोमीटरच्या रस्त्याचे २० मार्च रोजी डांबरीकरण केले. बंद असतानाही हे काम सुरू होते. घाईघाईत करण्यात आलेल्या कामात डांबरीकरण करताना रस्त्याच्या कडेचा भाग अर्धवट ठेवून दिल्याचे उघड झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला खड्डा आहे. त्यामुळे कंत्राटदाराच्या कामावर संशय निर्माण झाला आहे. सध्या रस्त्यावर असलेल्या शुकशुकाटामुळे हे चित्र उघडे पडले. केवळ एखाद्या ठिकाणी असा प्रकार घडला नसून अनेक ठिकाणी अशा प्रकारे डांबरीकरण करण्यात आले आहे. रस्ता आणि पेव्हरब्लॉकची बरोबरी करण्यात आली नव्हती, तर मग डांबरीकरण का केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.