पनवेल तालुक्यात १७ रुग्ण

पनवेल तालुक्यात आजवर करोनाचे २० रुग्ण आढळले असून यापैकी तीन जण बरे झाले आहेत. यामुळे एकूण रुग्णांची संख्या १७ आहे. यामध्ये मुंबईच्या विमानतळावर काम करणाऱ्या ११ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांचा समावेश आहे.


पनवेल महापालिका क्षेत्रात सुरुवातीला कामोठ्यात रुग्ण सापडला. तो बरा होत नाही, तोच दुसरा रुग्णदेखील कामोठ्यातच आढळला. त्यानंतर करोना रुग्णांची संख्या पाच इतकी झाली. कळंबोलीतील सेक्टर-४मध्ये असलेल्या सीआयएसएफ जवानांच्या इमारतीत एकाच वेळी ११ जणांना करोना झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे कळंबोलीतील सेक्टर-४मधील काही परिसर सील करण्यात आला. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण १६ रुग्ण करोना रुग्ण होते. यापैकी दोन नागरिक आणि सीआयएसएफ जवानांपैकी एक जण बरा झाला झाल्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या १३ झाली. याशिवाय पनवेल तालुक्यातील उलवे नोडमध्येदेखील चार रुग्णांची नोंद झाली आहे. उलवे नोडमध्ये परदेशातून आलेल्या एका रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे तीन जणांना करोनाची लागण झाल्याची नोंद झाली. म्हणजेच पनवेलमध्ये आजवर एकूण २० रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आता रुग्णांची संख्या १७ आहे, अशी माहिती पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.